नाशिक : येत्या बुधवारी (दि. १२) हरितालिका पूजन असून, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गुरुवारी (दि. १३) श्री गणेशचतुर्थीला घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना व पूजन केले जाणार आहे. गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी २.५२ वाजेपर्यंत भद्रा असला तरी श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये, असे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे.
तीन दिवसांवर विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन येऊन ठेपले असल्याने सर्वत्र त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा गणेशचतुर्थीला भद्रा असल्याने भद्रा दोषात प्रतिष्ठापनेविषयी भाविक वर्गात शंका-कुशंका आहेत. मात्र याबाबत मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, येत्या गुरु वारी पहाटे ब्राह्ममुहर्तापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत भाविकांना कोणत्याही वेळी ‘मंगलमूर्ती मोरया..’च्या जयघोषात घरातील श्रीगणेशाची स्थापना करून पूजन करता येईल. यावर्षी गणेश उत्सव ११ दिवसांचा आहे. आपल्या घरी जितके दिवस उत्सव असेल तितके दिवस सकाळी पूजा व रात्री आरती, मंत्रपुष्पांजली करावी. घरातील मूर्ती सुमारे एक वीत म्हणजे ७ ते ८ इंच उंचीची असावी. ही मूर्ती आसनस्थ आणि सुबक असावी तसेच मातीची अथवा शाडूची असावी, असेही मोहन दाते यांनी म्हटले आहे. याचबरोबर यावर्षी शनिवार, दि. १५ सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर संपूर्ण दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येणार आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन व भोजन असून, १६ सप्टेंबर रोजी रविवारी गौरीपूजन नेहमीप्रमाणे करावे तसेच सोमवार, दि. १७ सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर विसर्जन असल्याने सोमवारी दिवसभरात केव्हाही गौरीचे उत्तरपूजन करून गौरी विसर्जन करता येईल व परंपरेप्रमाणे गौरीचे दोरे घेता येतील, असे दाते यांनी स्पष्ट केले आहे.
पुढल्या वर्षी बाप्पा लवकर
यावर्षी गणेशोत्सव अकरा दिवस साजरा होणार आहे. पुढील वर्षी श्रीगणेशाचे आगमन ११ दिवस लवकर म्हणजे २ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. मागील वर्षी २५ आॅगस्टला आगमन झाले होते. यापुढील वर्षांमध्ये म्हणजे २०२० मध्ये २२ आॅगस्ट, २०२१ मध्ये १० सप्टेंबर, २०२२ मध्ये ३१ आॅगस्ट, २०२३ मध्ये १९ सप्टेंबर, २०२४ मध्ये ७ सप्टेंबर, तर २०२५ मध्ये २७ सप्टेंबरला श्री गणरायाचे आगमन होईल. - मोहनराव दाते, पंचांगकर्ते