नाशिक : मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी वारंवार केली जात आहे. त्यांची मागणी रास्त असून आमचादेखील या मागणीला पुर्वीपासून पाठिंबा राहिलेला आहे. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नाशिक शहरातील गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौकामध्ये थोरात सभागृहाच्या प्रारंगणात छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजेपासून आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. या आंदोलनस्थळी विविध लोकप्रतिनिधी हजेरी लावत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, ११वाजता भुजबळ यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यांनी संभाजीराजे यांची भेट घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेनेसह सर्वांची हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता या समाजालाही आरक्षणापासून वंचीत ठेवता कामा नये, असे भुजबळ म्हणाले. राज्य सरकार राज्याच्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत; मात्र सर्वोच्च न्यायालयात घडणाऱ्या घडामोडींबाबत केंद्र सरकारनेसुध्दा अधिक गंभीरपणे खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते. केंद्र सरकारने हस्तक्षेप करत कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. याप्रसंगी कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार भारती पवार, आमदार नितीन पवार, दिलीप बनकर, सुहास कांदे, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आदि उपस्थित होते.