नाशिक : चलनटंचाईच्या झळा नाशिककरांनाही सहन कराव्या लागत आहे. जवळपास आठवडाभरापासून जाणवत असलेले चलनटंचाईचे गडद होत असताना गुरुवारी रात्री बँकांना चलनपुरवठा झाल्याने शुक्रवारपासून परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. या नोटांच्या टंचाईमुळे दैनंदिन व्यवहारांत बहुतांश नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने खरेदी-विक्रीसह अन्य व्यवहार पूर्ण केल्याने आॅनलाइन व्यवहारांध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ८० ते ९० टक्के एटीएमसाठी रोख रक्कम उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील चलनटंचाईची समस्या बिकट बनली होती. परंतु, नाशिककरांनी रोख रखमेअभावी दैनंदिन व्यवहार व कामकाजावर फारसा परिणाम होऊ दिला नाही. शक्य तितक्या व्यवहारांमध्ये मोबाइल वॉलेट अॅपसह आॅनलाइन व्यवहार करीत नाशिककरांनी परिस्थितीचा सामना करीत आहे. त्यामुळे एकीकडे एटीएममध्ये खडखडाट सुरू असतानाही दुसरीकडे शहरातील विविध बाजारपेठेतील व्यवहार सुरुळीत सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत शुक्रवारपासून काही विविध बँकांकडून एटीएमसाठी काही प्रमाणात का होईना रोकड उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे आता बँकांना चलन पुरवठा झाल्याने शहरातील चलनटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. परंतु, सोशल मीडियावर नोटटंचाई आणि नोटबंदीविषयी वेगवेगळ्या चर्चा होत असल्याने नागरिकांच्या संभ्रमात वाढ होताना दिसत आहे. सध्या कार्यरत असलेले एटीएम, तांत्रिक बिघाड असलेले एटीएम व रोख रकमेच्या तुटवड्याअभावी बंद असलेले एटीएम किती अशाप्रकारची कोणतीही माहिती विविध बँक व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून दिली जात नसल्याने नागरिकांमधील संभ्रमात वाढ होत आहे. या संभ्रमात सोशल मीडियातील विविध अफवा पसरवणाऱ्या नोटाबंदी व नोटाटंचाईबाबतच्या पोस्टमुळे आणखी भर पडत आहे. विविध बँकांच्या ग्राहकांचा त्यांच्या खात्यावर असलेले पैसे शक्य त्या मार्गाने काढून घेण्याकडे कल वाढला आहे. बँकांच्या एटीएममध्ये काही प्रमाणात रक्कम टाक ण्यात आल्याने नागरिकांना पैसे मिळू लागल्याने परिस्थितीत सुधारणा दिसत असली तरी पैसे मिळत असलेल्या एटीएममधून कमाल मर्यादेत रक्कम काढणाºया ग्राहकांची संख्या अजूनही अधिक असल्याने पैशांचा भरणा केलेली एटीएम वेगाने रिकामी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कॅश नसल्याने आॅनलाइन व्यवहारांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:51 AM