गेल्या १६ जानेवारीस सर्व प्रथम वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय तसेच पंचवटी कारंजा येथेच सेाय होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात ग्रामीण भागातून येणारा ताण अधिक असल्याने तेथे सहसा शहरातील नागरिक जात नाहीत. त्यातच महापालिकेने नागरिकांना लस देण्यासाठी केंद्रे वाढवलीत. परंतु त्यात सर्व शहरी आरोग्य केंद्रे आणि महापालिकेची काही रुग्णालये यांंचा समावेश केला आहे. मात्र, या सर्व यादीत पश्चिम भागातील त्र्यंबकरोड, कॉलेजरोड आणि गंगापूररोड भागात महापालिकेचे लसीकरण केंद्रच नाही. कारण हा उच्चभ्रूंचा भाग मानला जात असल्याने तेथे महापालिकेचे शहरी आरेाग्य केंद्रच नाही. परिणामी येथील नागरिकांना कधी गंगापूर तर कधी सातपूरचे इएसआयसी, सिडकोचे मोरवाडी रुग्णालय किंवा पंचवटी कारंजा येथील पंचवटी कारंजा येथील रुग्णालयात लसीसाठी शोध घ्यावा लागतो.
पश्चिम भागातील नागरिकांसाठी शहरी आरोग्य केंद्र नाही की लसीकरण केंद्र नाही. त्यामुळे बारा बंगला येथील पाणीपुरवठा विभागाच्या जागेतील अधीक्षक अभियंत्यांच्या रिक्त निवासस्थानी शहरी आरोग्य केंद्र सुरू करावे आणि त्याच ठिकाणी लसीकरणदेखील सुरू करावी, अशी मागणी शिवाजी गांगुर्डे यांनी केली आहे.
कोट...
पश्चिम भागातील अनेक निम्नवर्गीय नागरिक राहतात त्यांच्यासाठी शहरी आरोग्य केंद्र असण्याची गरज आहे. सध्या बारा बंगला येथील जलशुध्दीकरण केंद्रातील अधीक्षक अभियंता निवासस्थानी लसीकरण केंद्र सुरू करावे.
- शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक
इन्फो...
महापालिकेचा लसीकरण केंद्रांचा अजब कारभार आहे. रामवाडी शहरी आरोग्य केंद्र खरे तर पंचवटीत रामवाडीत हवे, परंतु प्रत्यक्षात पश्चिम प्रभागात केटएचएम कॉलेजच्या मागे, थोरात सभागृहाजवळ आहे. पश्चिम भागातील नागरिकांना त्याची माहिती नाही आणि रामवाडीतील नागरिकही त्याचा लाभ घेऊ शकत नाही.