नाशिक : दिल्ली येथे वन रॅँक वन पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन करणारी संस्था ही राजकीय पक्ष आहे. माजी सैनिकांच्या शिखर संस्थेचा त्यांच्याशी कोणत्याही संबंध नव्हता. तथापि, एका माजी सैनिकाच्या आत्महत्त्येवरून सुरू झालेले राजकारण गैर असल्याचे मत नाशिकमधील भारतीय माजी सैनिक संघटनेने व्यक्त केले आहे.दिल्ली येथे वन रॅँक वन पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून, त्यातच हरियाणातील राम किशन गरेवाल या माजी सैनिकाने आत्महत्त्या केल्याने वातावरण चिघळले आहे. विशेषत: कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या विषयावर राजकारण होऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.भारतीय माजी सैनिक संघटना ही मान्यताप्राप्त असून, थेट राष्ट्रपतीच या संघटनेचे पालक आहेत. या संघटनेसह अन्य मान्यताप्राप्त संघटनेने गेले वर्षभर दिल्लीत आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारने वन रॅँक वन पेन्शन देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार त्रुटी दूर करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे, असे असताना फौजी जनता पार्टी या राजकीय पक्षाने दिल्लीत आंदोलन सुरू केले. त्याचा आणि माजी सैनिकांच्या प्राधिकृत संस्थेचा कोणताही संबंध नाही. तथापि, एका माजी सैनिकाने आत्महत्त्या करणे दुर्दैवीच आहे. असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद पाटील यांनी सांगितले. वन रॅँक वन पेन्शन आणि आत्महत्त्या यावरून राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. जर माजी सैनिकांच्या समस्यांविषयी इतकाच भावनिक जिव्हाळा असेल तर वन रॅँक वन पेन्शन ही मूळ मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही पाटील म्हणाले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सैनिकांच्या नावावर राजकारण नको
By admin | Published: November 04, 2016 1:04 AM