आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:10 AM2019-07-27T01:10:37+5:302019-07-27T01:11:00+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे.

There is no proposal on inclusion of MNS in the front | आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

Next

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे. येत्या निवडणुकीत आघाडी सत्तेवर येईल, असा दावा करतानाच कॉँग्रेस आघाडीत मनसेला सामावून घेण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही व तसा प्रयत्नही सुरू नसल्याचा निर्वाळा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला  आहे.
नाशिक येथे उत्तर महाराष्टÑातील कॉँगे्रस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी थोरात बोलत होते. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली हे मान्य मात्र त्या भेटीत काय चर्चा झाली ते आपल्याला माहिती नाही. असे सांगून थोरात यांनी, सध्या भाजपकडून देशपातळीवर विरोधी आमदारांना फोडण्याचे प्रयत्न केले जात असून, त्यातील काहींना चौकशीची भीती आहे, तर काहींना लोकसभा निवडणुकीनंतर
असुरक्षित वाटू लागल्याने ते भाजपत प्रवेश करीत आहेत, मात्र बाहेरच्या लोकांच्या येण्याने मूळ भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येदेखील अस्वस्थता निर्माण झाली आहे.
‘आमचे काय’ असा प्रश्न ते विचारू लागले असून, एकनाथ खडसे यांचे विधीमंडळातील भाषण हा त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले. कॉँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांनी जावे, त्यांना अडवणार नाही, असे सांगून थोरात यांनी, पक्षावर अशा प्रकारे परिस्थिती पहिल्यांदाच ओढवलेली नाही. यापूर्वीही अशा प्रसंगाना पक्ष सामोरे गेला व नव्याने उभारी घेऊन उभा राहिला आहे. जे गेले त्यांच्या ऐवजी नव तरुणांना संधी देऊन ही उणीव आपण भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या सेना प्रवेशाच्या वृत्ताबद्दल बोलताना थोरात यांनी त्या निव्वळ वावड्या असल्याचे सांगितले व अशा प्रकारचा प्रचार करण्यात भाजपाच अग्रस्थानी असून, त्यांच्या रणनितीचा तो भाग असल्याचा आरोप केला. देशपातळीवर होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना दुर्दैवी असून, गरीब, अल्पसंख्याक समाजावर हल्ले, धमक्या देण्याचे प्रकार घडू लागले आहेत, त्याचे समर्थक कोणी करू नये. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी पुढाकार घ्यावा व मॉब लिंचिंगच्या विरोधात कडक कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने सोपविली असून, जागोजागी मेळावे, बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत आहोत, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरल्याचे समजू शकतो. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले व सर्वांना बरोबर घेऊन चालणाºया उमेदवारांना पक्ष संधी देईल, असेही थोरात यांनी शेवटी सांगितले. यावेळी प्रभारी चांद रेड्डी, मुजफ्फर हुसेन, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवते
शिवसेना व भाजपत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना थोरात यांनी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, मराठवाडा, विदर्भात अद्यापही पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत आला आहे, आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अशी परिस्थिती असताना सत्तेतील लोक मुख्यमंत्रिपदाची चर्चा करतातच कशी असा प्रश्न केला. सरकारने दुष्काळी परिस्थितीवर लक्ष द्यावे, तसेही मुख्यमंत्री कोण हे शेवटी जनताच ठरवत असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: There is no proposal on inclusion of MNS in the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.