नाशिक : सिंहस्थविषयक कुठलेही प्रस्ताव महासभेवर प्रलंबित नाही आणि स्थायी समितीवर प्रस्ताव असतील तर ते समिती निकाली काढेल, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कामांसबंधी पाठविलेले पत्र महासभा मानत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. सिंहस्थविषयक प्रलंबित कामांसंबंधी मान्यता देण्यासंबंधी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पत्र पाठविले होते. प्रलंबित कामांमुळे कुंभमेळा व्यवस्थापनात अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. सदर पत्राची प्रत महापौर आणि स्थायी समिती सभापतींनाही पाठविण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून एकप्रकारे महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप केला जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पत्राबाबत महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले, सिंहस्थ आराखड्याला महासभेने मान्यता दिल्यानंतर त्याचवेळी त्याला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. आराखडा मंजूर झाल्यानंतर आराखड्यातील कुठलेच काम पुन्हा मंजुरीसाठी महासभेकडे येत नाही. या आराखड्याव्यतिरिक्त जी दोन-पाच कामे होती त्यांनाही महासभेने तत्काळ मंजुरी दिलेली आहे.
सिंहस्थविषयक कुठलेही प्रस्ताव महासभेवर प्रलंबित नाही
By admin | Published: May 15, 2015 1:45 AM