नाशिक : शहर विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीतील संभाव्य बदल व सूचनांसंबंधी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु, यावेळी बंदिस्त बाल्कनी व पूररेषेतील बांधकामांना परवानगी न देण्याचे संकेत उपस्थित नगररचनाच्या सहसंचालकांनी दिल्याने नाशिककरांवरील दुष्टचक्र कायम राहणार आहे. शहर विकास आराखडा व विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील संभाव्य बदलाबाबत क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्रेडाईकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या दालनात क्रेडाईसह आर्किटेक्ट व इंजिनिअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी बांधकाम नियमावलीतील सेव्हींग्स, पार्किंग, बाल्कनी, अॅमेनिटी स्पेस या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. बैठकीला नगररचनाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यासुद्धा उपस्थित होत्या. ८ फेबु्रवारी २०१७ पूर्वी जी बांधकामविषयक प्रकरणे मंजुरीसाठी महापालिकेकडे दाखल झालेली आहेत ती जुन्याच विकास आराखड्यानुसार मंजूर करावी, अशी मागणी क्रेडाईसह अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बाल्कनी बंदिस्त करण्याचा विषयही वगळता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने बाल्कनीचाही मुद्दा बांधकाम व्यावसायिकांना छळणार आहे. बैठकीला महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक आकाश बागुल, कार्यकारी अभियंता संजय घुगे, उपअभियंता नरसिंघे, प्रशांत पगार, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे अध्यक्ष प्रदीप काळे, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गुळवे, असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे अध्यक्ष विजय सानप, आयआयआयडीचे अध्यक्ष हेमंत दुगड, राजन दर्यानी, आर्किटेक्ट विवेक जायखेडकर, नितीन कुटे, कुणाल पाटील व रवि महाजन आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पूररेषा बांधकामांना दिलासा नाहीच
By admin | Published: March 22, 2017 1:06 AM