नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तपदी नुकतेच मुळ बिहार राज्याचे निवासी असलेले १९९९च्या भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीतील अधिकारी दीपक पाण्डेय यांची नियुक्ती करण्यात आली. ते यापुर्वी राज्याच्या तुरुंग महानिरिक्षकपदावर कार्यरत होते. कोरोनाच्या संक्रमणकाळात त्यांनी तुरुंगातील बंदीवानांकरिता राबविलेला ‘मनशांती’ व ‘गोल्ड मिल्क’चा फॉर्म्यूला चांगलाच गाजला. दीपक पाण्डेय यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
* नाशिक शहरात गुन्हेगारीबाबत नेमकी कोणती आव्हाने आपल्याला जाणवतात?- नाशिकला ऐतिहासिक व धार्मिक-पौराणिक वारसा आणि संस्कृती लाभली आहे. काळानुरुप हे शहर वेगाने प्रगती साधत असतानाा शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव नक्कीच झालेला दिसुन येतो. घरफोडी, दुकानांची लूट तसेच औद्योगिक क्षेत्र मोठे असल्याने अनेकदा त्या भागातही गुन्हेगारीच्या घटना घडतात. प्राथमिक अशा काही गुन्ह्यांचे आव्हान असून त्यादृष्टीने नक्कीच कायदासुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.* शहर पोलीस दलात तीन पोलिसांचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोनापासून बचावासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात?- हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे, कारण कोरोनासोबत अवघा देश लढत असताना पोलीस प्रशासन आॅन रोड राहून सामना करत आहेत.त्यामुळे पोलीस दलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न नक्कीच गांभीर्याने घेतला आहे. कारण पोलीस कर्मचारी, अधिकारी जेव्हा कर्तव्य बजावत असतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्याही मनात भीतीचा गोळा उठतो. त्यामुळे पोलिसांकरिता आयुक्तालयाच्या हद्दीत हक्काचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरु करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये सुमारे १०० खाटांची क्षमता राहणार आहे. या सेंटरची खरी तर कोणालाच गरज पडायला नको,मात्र दुर्दैवाने गरज भासली तर गैरसोय होऊ नये, म्हणून ही सुसज्जता आहे. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांपैकीही कोणाला गरज भासली तर त्याला या सेंटरचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे शहर पोलीस दलासाठी स्वतंत्रपणे पहिल्या टप्प्यात तीन व दुसऱ्या टप्प्यात तीन अशा सहा रुग्णवाहिकांची उपलब्धता करुन देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करत आहेत.* शहर पोलीस दलातील किती कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत? त्यापैकी रुग्णालयात किती आणि कोरोनामुक्त किती झाले?- शहरात कोरोनाचे संक्रमण तेजीने फैलावण्यास सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनाही त्याची लागण झाली. पोलीस सर्वोतोपरी आपली व कटुंबियांची काळजी घेत कर्तव्य बजावत आहेत; मात्र शेवटी पोलीसदेखील माणूसच आहे. त्यामुळे काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आयुक्तालयातील सांख्यिकीचा विचार केला तर २०८ पोलीस कर्मचारी बाधित झाले. त्यापैकी १४५ कर्मचारी उपचारानंतर ठणठणीत बरे होऊन घरीसुध्दा परतले असून केवळ १८ कर्मचारी रुग्णालयात दाखल आहेत. २३ कर्मचारी होम क्वारन्टाईन असून ते घरीच औषधोपचार घेत आहेत. दुर्दैवाने तीघा कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे बळी गेला. यापुढे पोलीस आयुक्तालयात कोरोनामुळे कोणाचेही प्राण जाणार नाही, यासाठी मी सर्वप्रथम विविध उपाययोजनांवर भर देत आहेत. पोलीस आयुक्तालयातील शिपायापासून अधिकाºयापर्यंत सर्वांच्या मनातील कोरोनाविषयीची भीती दूर करणे हा माझा पहिला प्रयत्न आहे. यासाठी मी दोन्ही परिमंडळाचे सहायक आयुक्त, उपायुक्तांनाही सुचना दिल्या असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये स्वत:भेट देत पोलिसांचे प्रबोधन करत आहे.* शहराची गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आपले पुढील काय नवीन धोरण राहणार आहे?- नवीन धोरणांची गरज नाही. कारण पोलीस म्यॅन्युअल ठरलेले आहे. म्यॅन्युअलप्रमाणे मी गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारच यात शंका नाही, कारण तीच माझी मुख्य जबाबदारी आहे व शासनाने त्यासाठीच मला नियुक्त केले आहे. मी लेखी स्वरुपात निर्णय देतो उगाचच काहीतरी घोषणाबाजी करणे मला योग्य वाटत नाही. गुन्हेगारीचा रोग जसा असेल तसे मी ‘औषध’ देणार आहे.* नाशिक शहराबद्दल आपल्याला काय वाटते?- नाशिक माझ्या पसंतीचे शहरांपैकी एक शहर आहे. या शहराला धार्मिक-पौराणिक वारसा व संस्कृती तर आहेच, मात्र शहराला अल्हाददायक वातावरणाचे वरदानही लाभले आहे. नाशिक माझ्या नेहमीच पसंतीचे राहिले आहे. या शहराची सेवा करण्याची मला संधी लाभली असून हे मी माझे भाग्य समजतो. शहरात कायद्याचे कोणत्याहीप्रकारचे उल्लंघन कोणीही केले तर ते खपवून घेतले जाणार नाही. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रिदनुसार आयुक्तालय हद्दीत पोलिसींग चालेल, अशी मी ग्वाही देतो.मुलाखत : अझहर शेख, नाशिक