सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील फुुलेनगर (माळवाडी) येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, मागणी करूनही टॅँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. टँकर सुरू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.जानेवारी महिन्यापासूनच फुलेनगर येथे पाणीटंचाई जाणवू लागली होती. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीने ठराव करून पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरची मागणी सुरू करण्याची मागणी केली होती. फेबु्रवारी महिन्यात ग्रामपंचायतीने पुन्हा ठराव करून फुलेनगर (माळवाडी)चा समावेश वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेत करण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना न झाल्याने सरपंच आशा लोंढे, उपसरपंच रवि पठाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण अत्रे, रंजना ढमाले, नूतन गलांडे यांच्यासह पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, माजी सरपंच संपत पठाडे, पोपट लोंढे, दत्तात्रय आनप, संभाजी ढमाले, सयाजी लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांनी भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. (वार्ताहर)
टँकर सुरू होत नसल्याने संताप
By admin | Published: March 07, 2017 12:30 AM