नाशिक : शहरात गेल्या महिनाभरापासून डास प्रतिबंधित धूर व औषध फवारणी होत नसल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला असून, तपमान वाढीमुळे डासांची पैदास वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत अजूनही संशयकल्लोळ कायम असून, बडगुजर यांनी ३ मार्च २०१४ रोजी मंजूर झालेल्या निविदेवर आयुक्तांकडून आधी निर्णय होणे अपेक्षित असताना नव्याने १६ कोटींची निविदा काढण्याचे कारण काय, असा सवालही विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे. पेस्ट कंट्रोलचा नव्या नियमावलीनुसार ठेका देण्यापूर्वी मागील ठेकेदारालाच तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायीवर प्रलंबित आहे. मात्र, अत्यावश्यक काम असल्याने महापालिकेमार्फत सदर धूर व औषध फवारणीचे काम सुरू असल्याचा दावा आरोग्याधिकारी डॉ. बुकाणे करत असताना विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी मात्र, महिनाभरापासून शहरात धूर व औषध फवारणीचे काम बंद असून, महापालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांना साहित्यच पुरविले जात नसल्याचा आरोप केला आहे. बडगुजर यांनी सांगितले, शहरात डासांची ७९४७ कायमस्वरूपी उत्पत्तीस्थाने आहेत. सात दिवसांत याठिकाणी औषध फवारणी करणे आवश्यक असते. अन्यथा डासांची पैदास वाढते. परंतु महिनाभरापासून शहरात धूर व औषध फवारणी थांबली आहे. ठेकेदाराचे १९२ कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांना केवळ सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. त्यांना फवारणीसंबंधी साहित्य व औषध पुरविले जात नाही. आता तपमानात होणारी वाढ लक्षात घेता डासांना पोषक असे वातावरण निर्माण होत आहे. नेमके याचवेळी धूर व औषध फवारणीत हेळसांड झाल्यास मागील वर्षी डेंग्यूच्या आजाराला ज्या पद्धतीने नाशिककरांना सामोरे जावे लागले, त्यापेक्षाही अधिक भयानक परिस्थिती कुंभमेळ्यात निर्माण होऊ शकते, अशी भीतीही बडगुजर यांनी व्यक्त केली. दरम्यान, महासभेने १९ सप्टेंबर २०१३ रोजी पेस्ट कंट्रोलचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार दोन कोटी ५५ लाखांची पाच टक्के जादा दराने निविदा प्राप्त झाली. तीनदा निविदा काढण्यात येऊन ३ मार्च २०१४ रोजी मंजूर झालेली निविदा आयुक्तांकडे कार्यादेशासाठी प्रलंबित आहे. प्रशासनाकडून तब्बल १६ कोटींची निविदा काढली जात असल्याबद्दल बडगुजर यांनी संशय व्यक्त केला आहे.
महिनाभरापासून धूर-औषध फवारणी नाही
By admin | Published: January 31, 2015 12:50 AM