नाशिक : जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही आवश्यक पाणी नाही. मात्र तूर्तास नाशिक शहरासाठी पाणी कपातीचे कोणतेही नियोजन नाही. परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दुष्काळी परिस्थिती व टंचाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर महाजन बोलत होते. जिल्ह्यातील धरणात ४२ टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी ८२ टक्केइतका साठा होता. त्यामुळे आता शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देणे मुश्किल आहे. अजून दहा महिने काढायची आहेत. जिल्ह्णात जनावरांना पाणी व चारा नियोजन करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. सर्व खातेप्रमुखांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बागा वाचवायच्या की माणसे हा विचार आधी करणे महत्त्वाचे आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस आलाच आणि धरणात पाणीसाठा आवश्यक झाला, तर शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाईल. नाशिककरांचीच पाण्याची मुबलक प्रमाणात सोय नाही. तेव्हा मराठवाड्याला पाणी सोडण्याचा विषयच येत नाही. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मराठवाड्याला पाणी सोडणे आवश्यक असले तरी जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा नसल्याने पाणी सोडणार तरी कोठून, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, न्यायालयाने आदेश दिले तर पाणी सोडले जाईल. (प्रतिनिधी)
तूर्तास पाणीकपात नाही
By admin | Published: September 11, 2015 12:55 AM