नाशिक : गृहमंत्री अनिल देशमुख् यांच्यावर झालेले आरोप सनसनाटी आणि खळबळजनक आहेत. त्यामुळे त्यातील सत्यतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, या संपूर्ण प्रकरणात काही गोष्टींवर योग्यवेळी निर्णय घेणे अपेक्षित होते. सत्तेपुढे शहाणपण नसते, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी लेटरबॉम्ब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
शनिवारी नाशिकला आलेल्या खासदार राऊत यांनी रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना हे विधान केले. गृहमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप होणे हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्यांनी हे सरकार यावं, यासाठी खारीचा वाटा उचलला, अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायकच आहे. त्यामुळे सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपले पाय जमिनीवर आहेत का हे प्रत्येकाने तपासले पाहिजे. आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त असून त्यांच्या पूर्वीच्या कामाबद्दल नक्कीच कौतुक आहे. मात्र, त्यांच्या पत्रावर तपास करावा असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. योग्य तो निर्णय घेण्याची भूमिका पवार पार पाडतील. मात्र, विरोधी पक्षाने मागणी केल्यानुसार सरकार चालत नसते, असेही राऊत यांनी नमूद केले.
इन्फो
सरकारवर शिंतोडे उडाल्याचे मान्य
माझी या संपूर्ण प्रकरणात कोणतीही वैयक्तिक भूमिका नाही. मात्र, पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. आमची राजवटदेखील उत्तम चालली आहे, मात्र, काहीतरी दुरुस्ती करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकारणात सरकारवर शिंतोडे उडाले हे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा माझ्याकडे आहे. त्या असेही राऊत यांनी नमूद केले.