विशेष म्हणजे महापालिकेने यासंदर्भात एक अमरधाममधील ठेकेदारास नोटीस बजावली असली तरी अन्य काही अमरधाममध्ये असे प्रकार सुरूच आहेत.
नाशिक महापालिकेने २००१ मध्ये मोफत अंत्यसंस्काराची योजना राबविली. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे खर्च येत नाही. केवळ त्याने स्वेच्छेने काही रक्कम दानपेटीत टाकावी, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. परंतु स्मशानभूमीत लाकूड फाटा, रॉकेल, गोवऱ्या पुरवण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या ठेकेदाराकडून मात्र, आता त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. अमरधाममध्ये कोविड अथवा कोविड नसलेल्या व्यक्तीचा मृतदेह आला तर अंत्यसंस्कारासाठी साहित्य पुरवणे आणि मदत करणे या सर्व कामांसाठी ३ ते ४ हजार रुपये घेतल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे रक्कम न देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुरेसे लाकूड न देणे, रॉकेल शिल्लक नाही असे सांगण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन नाशिक महापालिकेने पंचवटी या एकाच अमरधामच्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे व कारणे देण्यास बजावले आहे.
इन्फो..
मोफत अंत्यसंस्कार नावालाच
नाशिक महापालिकेच्या वतीने सर्व अमरधाम तसेच सर्व धर्मियांसाठी मोफत अंत्यसंस्कार योजना माणुसकीच्या भावनेतून राबवली जात आहे. महापालिकेला तोटा होत असताना ही सेवा दिली जात असताना ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून मात्र पैसे घेतले जात असल्याने मोफत अंत्यसंस्कार योजना नावालाच असल्याचे सध्या तरी दिसत आहे. नागरिकांनी स्वखुशीने दिले तर ठीक परंतु सक्ती करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे महापालिकेच्या कल्पनेलाच हरताळ फासला जात आहे.
इन्फो...
रुग्णालयात बेड स्मशानात जागा मिळेना!
सध्या कोरोनाबाधितांची अवस्था बिकट झाली आहे. शहरात कोणत्याही रुग्णालयात बेड मिळत नाही. महापालिकेने हेल्पलाईन सुरू करूनदेखील त्याचा उपयोग होत नाही आणि दुसरीकडे अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत बेड मिळत नाही अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे.
इन्फो..
हे घ्या पुरावे...
गैरव्यवहारात पुरावे ठेवले जात नाही असे म्हटले जाते किंबहुना कोणी तक्रारदार नाही असे सांगून शासकीय यंत्रणांकडून बोळवणूक केली जाते. मात्र पंचवटी अमरधाममधील तक्रारीबाबत तक्रारदार पुढे आला आहे. तर दुसरीकडे गंगापूर गाव येथील स्मशानभूमीत असा प्रकार आढळल्यानंतर या भागाचे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी संबंधीतांची कानउघाडणी केली आहे.
कोट...
अमरधाममधील ठेकेदारांनी मुळातच साहित्य पुरवायचे अशी त्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्यानंतर मदत करण्याच्या नावाखाली कोणी पैसे मागितले अशी तक्रार असेल तर त्याची दखल निश्चितपणे घेतली जाते. पंचवटी अमरधामसंदर्भात एक तक्रार आली होती. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग