नाशिक : किरकोळ कारणांवरून औरंगाबादेत जातीय दंगल उसळून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. सरकारचे गुप्तहेरखाते झोपले आहे काय, असा सवाल करत निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, कोरेगाव-भीमा आणि औरंगाबादच्या घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीसदेखील हतबल झाल्याची टीका राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी येथे केली.नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित असून, दंगलीची परिस्थिती हाताळण्यास पोलीस कमी पडले. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या औरंगाबादचे पोलीस आयुक्तपद दोन दोन महिने रिक्त राहतेच कसे? असा सवाल करून या दंगलीमागचे किरकोळ कारण व त्याची तीव्रता पाहता दंगल पूर्वनियोजित असल्याच्या संशयाला वाव घेण्यास जागा आहे. सरकारचे गुप्तहेर खाते झोपले होते की, दररोज मुख्यमंत्र्यांना राज्यातील परिस्थितीची ब्रिफिंग केली जाते त्यात ही माहिती जाणूनबुजून दडविण्यात आली काय, असा सवालही त्यांनी केला. सरकारने तत्काळ दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही पवार यांनी केली.दरम्यान, स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू असून अजित पवार यांनी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यातील भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ही निवडणूक नांदी ठरेल. तेव्हा समविचारी पक्षांनी एकजुटीने राष्टÑवादीच्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
गुप्तहेर खाते झोपले आहे का? - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:15 AM