मालेगाव (नाशिक) - मालेगाव येथे एका खासगी बसमधील प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. (शुक्रवार) रात्री अकरा वाजता मालेगाव येथुन सुरतला जाणारी सना ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक जी.जे. 05 झेड 2071 ही प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी सज्ज असतानाच सुरतहुन एक दुरध्वनी कंपनीच्या कार्यालयात धडकला. या दुरध्वनीने सगळ्यांना धडकीच भरली. अज्ञात व्यक्तीने मालेगाव सुरत बसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन गुजरातहुन मालेगाव कार्यालयास करण्यता आला होता.
खासगी ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक फहिम शेख यांनी कंपनीच्या मालकास सदर प्रकाराची माहिती दिली. ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून याची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली. याची गंभीर दखल घेत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी याबाबत वरिष्ठांना कळवित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ प्रवाशांना बसमधुन बाहेर काढले. त्यांनंतर, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनीही शहर बॉम्ब शोधक व नाशक पथकास पाचारण केले. पथकाने बससह बसमधील सामानाची सुमारे दोन तास कसुन तपासणी केली. मात्र, तपासणीत आक्षेपार्ह अशी कुठलीच वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणेसह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सदर प्रकाराची माहिती शहरात पसरल्याने नागरिकांनी किदवाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी शहिदोंकी यादगार ते आंबेडकर पुतळापर्यंत रस्ता बंद केला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सुरतहून मालेगावकडे येणाऱ्या खासगी बस महाराष्ट्र गुजरातच्या सीमारेषेवर थांबविण्यात येत असून या बसची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, बसमध्ये बाॅम्बसदृश्य कुठलीही वस्तू आढळून आली नसल्याचा खुलासा पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी केला आहे. तसेच, कुणीतरी खोडसाळपणा केला असून फोन करणाऱ्याचा शोध पोलिस घेत असून लवकरच त्यास ताब्यात घेण्यात येईल, अशी माहितीही नवले यांनी दिली.