'शरद पवारांनी मल्लिकार्जुन खर्गेंना फोन करुन सांगितलेलं'; तांबेंच्या उमेदवारीवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 03:41 PM2023-02-03T15:41:45+5:302023-02-03T15:43:01+5:30

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते.

There was drama in the Nashik Graduate Constituency of Vidhan Parishad till the last moment. | 'शरद पवारांनी मल्लिकार्जुन खर्गेंना फोन करुन सांगितलेलं'; तांबेंच्या उमेदवारीवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण

'शरद पवारांनी मल्लिकार्जुन खर्गेंना फोन करुन सांगितलेलं'; तांबेंच्या उमेदवारीवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण

Next

विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर ६८ हजार ९९९ मते पडली. तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते पडली. त्यामुळे सत्यजित तांबे या निवडणुकीत तब्बल २९ हजार ४६५ मताधिक्यांनी निवडून आले आहेत. 

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते. याठिकाणी काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देत त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर सुधीर तांबे मुलासह विभागीय कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना या सर्व घडामोडी घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला. 

सदर झालेल्या सर्व राजकीय नाट्यांवर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. सत्यजितला उमेदवारी द्या, असं स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करुन सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली. आताही काँग्रेसनं फार ताणून धरु नये. सत्यजितला पुन्हा सोबत घ्यावं, असं मला वाटतं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपाने निवडणुकीत कुणालाही उमेदवारी दिली नाही. मतदानाच्या दिवशीपर्यंत भाजपाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र पडद्यामागून सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी भाजपा प्रयत्नशील होती असं म्हटलं जाते. त्यात महाविकास आघाडीने याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना समर्थन दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होती.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजीत तांबे यांनी विजय प्राप्त केला. पण पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पराभव झाला असला तरी अजिबात खचून जाणार नाही आणि शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही, असं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे. ४० हजार मतं पडणं हे एका सामान्य घरातील लेकीसाठी फार विशेष आहे. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही", असं शुभांगी पाटील म्हणाल्या. 

माझ्या घरात कधी कोणी सरपंचही नाही-

माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून मला ४० हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते. महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. यात जुन्हा पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी १५ वर्ष म्हणजेच तीन टर्म हे सगळ्यांना माहित आहे. आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. मी माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: There was drama in the Nashik Graduate Constituency of Vidhan Parishad till the last moment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.