अपूर्वा जाखडी ।चीनचे २०१६ पासून अनियंत्रित झालेले अवकाश प्रयोगशाळेचे यान अरबी समुद्रात कोसळणार अशी भीती भारतासह जगभरातील विविध देशांना वाटत होती. त्यामुळे भारतावर या चिनी अवकाश प्रयोगशाळा यानाचा धोका होताच; मात्र तो सुदैवाने टळला. हे यान अरबी महासागरात कोसळणार अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र यानाचा अवकाशात स्फोट होऊन त्याचे तुकडे उल्का वर्षावाप्रमाणे प्रशांत महासागरात कोसळले. चीनने जगाला दाखविण्यासाठी २०११ मध्ये अवकाशात स्वतंत्ररीत्या साडेआठ टन वजनाची अवकाश प्रयोगशाळा २७० कोटी रुपये खर्च करून धाडले होते. अवकाश यान प्रयोगशाळा २०११ ते २०१५ पर्यंत योग्यरीत्या कार्यान्वित होती; मात्र अचानकपणे २०१६ पासून या यानाचे संपर्क चायनीज स्पेस एजन्सीसोबत पूर्णत: संपुष्टात आले. चीनच्या वैज्ञानिकांनी ही गंभीर बाब त्यांच्या एजन्सीने जगापासून लपविली. मात्र ही बाब नासा, इसा या अंतराळ संस्थांच्या वैज्ञानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर वैज्ञानिकांनी यानाला ट्रॅकिंग करण्यास सुरुवात केली. परंतु हे यान ट्रॅक होत नव्हते कारण पृथ्वी स्वत: व सूर्याभोवती फिरत असल्यामुळे ते अवघड होत होते आणि अवकाशात भरकटलेल्या यानाचे योग्य लोकेशन मिळत नव्हते. त्यामुळे भारतासह न्यूझीलंड, युरोप, ब्रिटन अशा सर्वच देशांना ते आपल्या हद्दीत कोसळण्याची भीती वाटत होती. या यानाचे वजन सुमारे साडेआठ टन इतके होेते. चीनने अवकाशात सोडलेल्या चीन प्रयोगशाळेचे नाव ‘पॅँगॉँग-१ चायनिज स्पेस स्टेशन’ असे दिले होते. हे यान २०१६पासून संपूर्णत: भरकटलेले होते. या यानावर कुठल्याही प्रकारे कोणाचेही नियंत्रण नव्हते. नियंत्रणाबाहेर यान झाल्याची जाणीव चायनिज स्पेस एजन्सीच्या वैज्ञानिकांना होती. जगापुढे आपले अपयश उघड होईल, या भीतीपोटी ही माहिती चीनकडून उघड करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून हे यान अनियंत्रीत होऊन अवकाशात भरकटत होते. यान कधीही पृथ्वीवर कोसळू शकते, याची शक्यता होती. या दिशेने नासा, इसा या अंतराळ संस्थांसह भारताच्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांनीही संशोधन सुरू ठेवत यान भारताच्या हद्दीत कोसळणार नाही, असा निष्कर्ष लावला होता. सोमवारी पहाटे चिनी प्रयोगशाळेचे यान अवकाशात जळाले आणि त्याचे तुकडे प्रशांत महासागरात पडले. यामुळे सागरी जैवविविधतेला काही प्रमाणात हानी पोहचली, मात्र पृथ्वीवरील वातावरणात त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.- लेखक नासाच्या स्पेस एज्युकेटर आहेत
भीती होतीच, पण सुदैवाने धोका टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:16 AM