सातपूर : भाजपाचे नगरसेवक सुदाम नागरे यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० मधील ‘ड’ जागेसाठी पोटनिवडणूक घोषित झाली असून, सोमवारी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात २८ हजार ५५६ मतदारांपैकी जवळपास दीड हजार नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपाकडून बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू असले तरी राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बिनविरोध निवडीचे प्रयत्न कितपत यशस्वी होतील, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.महानगरपालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी घेऊन सुदाम नागरे विजयी झाले होते. अवघ्या दीड वर्षात नगरसेवक सुदाम नागरे यांचे आकस्मिक निधन झाल्याने १० ‘ड’ साठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, दि. ३० मे ते दि. ६ जून दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकृती, १० जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी, २३ रोजी मतदान आणि २४ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीतदेखील युती कायम राहणार असल्याने शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार आहे. भाजपाकडून दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे या प्रबळ उमेदवार मानल्या जात असून, त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा नागरे कुटुंबीयांकडून केला जात आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांनी निवडून लढविण्याचा चंग बांधला आहे. राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे.ंमतदार यादी प्रसिद्ध : मतदारांत अनुत्साहमहानगरपालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात आली होती. त्या निवडणुकीत मतदारांची संख्या २७ हजार २२ एवढी होती. त्यात एक हजार ५३४ मतदारांची वाढ होऊन आता २७ हजार ५५६ एवढी झाली आहे. सोमवारी मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी मतदार यादीत नाव आहे की नाही? हे पाहण्यासाठी मतदारांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले.
मनपा प्रभाग १० मध्ये दीड हजार मतदार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:08 AM