नाशिक- शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह असला तरी मोजक्याच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांना रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चार लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.नाशिक शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच आढावा बैठक महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतली. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर आत्तापर्यंत ३ लाख ३२ हजार २३३ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर १ लाख २ हजार १८७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.नाशिक महापालिका हद्दीतील लोकसंख्या लक्षात घेता लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळे लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरात मर्यादित लसीकरण केंद्र असल्याने लसीकरणासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागतात. त्यातच अनेक केंद्रांविषयी तक्रारी आहेत काही केंद्र तर अत्यंत दूर असले तरी नागरिकांना पर्याय राहत नाही. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे केंद्र सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले.ज्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात नवीन लसीकरण केंद्र सुरू करायचे असेल त्यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रत्येक प्रभागात होणार चार लसीकरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:11 AM