नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून आयुष विभाग नागपूरला देण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच एकलहरा, वीज निर्मिती संच, अपर वन संरक्षक कार्यालय अशी अनेक कार्यालये नागपूरला स्थलांतरित होण्याचे आपण वृत्तपत्रातच वाचले असून, याबाबत संबंधित मंत्र्यांशी बोलून नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच मराठवाडा व विदर्भ येथील उद्योगासाठी कमी पैशाने वीज देण्याबाबतचाही निर्णय झालेला नाही. मात्र काहींच्या मनात याआधीच भीतीचा गोळा उठल्याने त्याबाबत आपण भाष्य करू शकत नाही. मात्र प्रत्येक निर्णयाला वेगवेगळे कंगोरे असू शकतात. मात्र नाशिकला एक न्याय आणि विदर्भाला दुसरा न्याय, असे होणार नाही. एकलहरा येथील वीज निर्मितीचा एक संच नागपूरला हलविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे अपर वन संरक्षक कार्यालये आहेत. त्यातील नाशिकचे अपर वनसंरक्षक कार्यालय नागपूरला हलविण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता, यापैकी कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नाही. नाशिकची एकेक कार्यालये नागपूरला हलविण्याचे प्रयत्न सुरू असतील तर आपण संबंधित मंत्र्यांशी बोलू. मात्र नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही. नाशिककरांचा विदर्भ आणि मराठवाड्यावर यातून प्रचंड रोष निर्माण झाल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू. नाशिककर आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून आपण काम करू, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल, विजय साने, महेश हिरे, लक्ष्मण सावजी, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, प्रशांत जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशिककरांवर अन्याय होऊ देणार नाही
By admin | Published: February 02, 2016 11:43 PM