विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकच नसतील : महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:27 AM2019-07-01T01:27:10+5:302019-07-01T01:27:41+5:30
मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे.
नाशिक : मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करीत असून, विरोधी पक्षनेतेदेखील भाजपत आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात विरोधकच शिल्लक राहणार नसल्याची टिका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये पार पडली. त्याच्या समारोप सोहळ्यात महाजन बोलत होते. व्यासपीठावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, खासदार भारती पवार, महिला मोर्चा राष्ट्रीय चिटणीस पूजा मिश्रा, आमदार देवयानी फरांदे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष कांता नलावडे, महापौर रंजना भानसी, नीता केळकर, उमा खापरे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू उपस्थित होते. महाजन यांनी यावेळी बोलताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ५० जागांही जिंकता येणार नसल्याचे भाकित केले. आतापर्यंतच्या निवडणुकीत माझा शब्द कधीच खोटा ठरला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभेच्या निवडणुकीत तीनशेहून अधिक जागा निवडूण येतील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी विश्वास दाखविल्याने भाजपाला पुन्हा एकदा विजय प्राप्त करता आला आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्र्यांचे काम असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नही त्यांनी कायदेशीर चौकटीत बसवून मार्गी लावला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे काँग्रेसी नेत्याचे तिघांचे तोंड तीन दिशेला आहे, तर दुसरीकडे विरोधी बाकावर पहिल्या फळीत बसणारे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी काहीत तरी करा, असे सांगत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक ५० जागाही जिंकू शकणार नाहीत . मात्र या निवडणुकीत विजयासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवाहन गिरीश महाजन यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
ही तर फिक्ंिसग : चव्हाण
विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.