इंदिरानगर :राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची संख्या अकरावरून तेरा होणार असून, त्यामध्ये मुंबई नाका व म्हसरूळ या दोन नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश आहे़ नव्याने होणाऱ्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये भारतनगर व शिवाजीवाडी या दोन झोपडपट्टीचा समावेश होणार आहे़ त्यामुळे येथील गुन्हेगारी घटनांची नोंद ही मुंबई नाका पोलीस ठाण्यात केली जाईल व पर्यायाने इंदिरानगर पोलीस ठाण्याचा ताण कमी होण्याची शक्यता आहे़१ एप्रिल २०१० मध्ये अंबड व भद्रकाली पोलीस ठाण्यातील काही भाग वेगळा करून त्यातून इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली़ या पोलीस ठाण्यामध्ये सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, पिंगुळबाग झोपडपट्टी, राजीवनगर झोपडपट्टी, भारतनगर झोपडपट्टी, शिवाजीवाडी झोपडपट्टी, कवटेकरवाडी झोपडपट्टी यांचा समावेश होता़ यातील बहुतांशी झोपडपट्ट्यांमध्ये मद्यविक्री, जुगार, मटका असे अवैध धंदे सुरू असून, पोलिसांनी अनेकदा छापेही मारले आहेत़ या झोपडपट्ट्यांमधील गटांमध्ये होणाऱ्या हाणामारी, लहान मुलांच्या खेळण्यावरून होणारे वाद, महिलांची भांडणे ही नेहमीचीच झाली असून, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी व गुन्हेही दाखल आहेत़ या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांना नेहमीच पोलीस गस्त, कोम्बिंग आॅपरेशन, आॅलआऊट या मोहिमा राबवाव्या लागतात़ पोलीस आयुक्तालयात नव्याने होणाऱ्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथील शनिमंदिर ते नासर्डी नदीपर्यंतचा परिसर हा समाविष्ट होणार आहे़ याचा सर्वाधिक फायदा इंदिरानगर पोलीस ठाण्यास होणार असून, त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी जाणार आहे़ तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आलेखही कमी होण्यास मदत होणार आहे़
पोलीस ठाण्यावरील ताण होणार कमी
By admin | Published: December 29, 2015 10:49 PM