रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कलम-१४४ नुसार पाण्डेय यांनी अधिसूचना सोमवारी (दि.२२) जारी केली आहे. ही अधिसूचना सोमवारी रात्री ११ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. संचारबंदी नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. रात्रीची गस्त सोमवारी वाढविण्यात आली होती. तसेच नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. पाण्डेय यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणेनिहाय महत्त्वाच्या पॉइंटवर बॅरिकेड्स लावून वाहनचालकांची विचारपूस व तपासणी केली जात होती. प्रत्येकाला मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, गुटखा, तंबाखू सेवन करण्यास किंवा थुंकण्यास बंदी आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी नियमांचे पालन करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे.
‘नाईट कर्फ्यू’मध्ये राहणार कडक नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:23 AM