धनंजय रिसोडकर, नाशिक : देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकोपयोगी उपक्रमांतर्गत राज्यातील ७५ गावांमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण ७५ ग्राम सचिवालये उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी २ ग्राम सचिवालये उभारण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये अशी रक्कम मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नमो ग्राम सचिवालय उभारणीसाठी एक कोटी रुपयांच्या निधीतून निकषानुसार गावांची निवड होणार आहे.
ग्रामपातळीवरील ग्राम विकास, महसूल, कृषी, विद्युत मंडळ विभागांच्या सेवा या ग्रामस्थांना अधिक कार्यक्षमतेने उपलब्ध करून देणे ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्यामुळेच या अभियानाचे नमो ग्रामसचिवालय अभियान असे नामकरण करण्यात आले आहे. त्यापूर्वीपासून ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पात्र ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यातून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना हा लाभ प्राप्त झाला आहे. मात्र, ही योजना नमो ग्रामसचिवालय नावाने असून त्यातून राज्यभरात केवळ ७३ ग्राम सचिवालयांचीच निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात महसूल मंडळातील अन्य कार्यालये आणण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधून एकत्रित आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सीईओंसह जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.