नाशिक : शिवसेनेला यंदा जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता आणणे शक्य दिसत असूनही केवळ बंडखोरी व चुकीच्या उमेदवारांची निवड यामुळे जवळपास दहाहून अधिक ठिकाणी शिवसेनेला पराभव पहावा लागल्याचे चित्र आहे.नाशिक, निफाडला बंडखोरी, तर मालेगाव, बागलाणला आहे त्या जागा न टिकविल्यानेच शिवसेनेला मिनी मंत्रालयावर स्वबळावर सत्ता स्थापण्याची संधी थोडक्यात हुकल्याची चर्चा आहे. मालेगाव तालुक्यात शिवसेनेकडे राज्यमंत्री दादा भुसे असतानाही सातपैकी पाच जागांवर पराभव स्वीकारावा लागला. शिवाय मागील पंचवार्षिकला शिवसेनेच्या ताब्यातील कळवाडी, सौंदाणे, रावळगाव या जागा शिवसेनेला टिकविता आल्या नाहीत. त्याचप्रमाणे निफाड तालुक्यातील शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी ओझरमधून मागील पंचवार्षिकला उमेदवार निवडून आलेला असताना यावेळी ओझर गटातून शिवसेनेचा उमेदवारच न दिल्याने शिवसेनेची ती एक जागा कमी झाली. त्यातच चांदोरीतून अधिकृत उमेदवार संदीप टर्ले पराभूत झाले, टर्ले यांना सेनेचे बंडखोर उत्तम गडाख यांच्या पत्नी लीलावती गडाख यांच्या उमेदवारीचा फटका बसला. मागील पंचवार्षिकला शिवसेनेच्या चार जागा असताना यावेळी मात्र त्या तीन जागा आल्या आहेत. नाशिक तालुक्यातून मागील वेळी शिवसेनेला एकही जागा नसताना यावेळी मात्र पळसे व एकलहरे गटातून दोन जागा निवडून येण्याची चिन्हे असतानाच दोन्ही ठिकाणी सेनेचे बंडखोर शंकर धनवटे व संजय तुंगार यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार खासदारपुत्र अजिंक्य हेमंत गोडसे व उपजिल्हाप्रमुख जगन आगळे हे पराभूत झाले. ब्राह्मणगाव गटातून मागील निवडणुकीत शिवसेनेकडून प्रशांत (पप्पू) बच्छाव निवडून आलेले असताना यावेळी मात्र त्यांच्या पत्नी पराभूत होऊन येथून भाजपाच्या लता विलास बच्छाव निवडून आल्या आहे (प्रतिनिधी)
...म्हणूनच सेनेचे हुकले ‘स्वबळ
By admin | Published: February 24, 2017 12:49 AM