एकलहरे : भारतात एन. टी. पी. सी.नंतर वीजनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून महानिर्मितीचा नावलौकिक आहे. मात्र, कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेला घरात सहजपणे वेळ घालवता यावा, यासाठी महानिर्मितीने सातत्याने वीजपुरवठा अखंड ठेवला असला तरीही या कंपनीचे कर्मचारी अजूनही पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून, महानिर्मितीने वीजनिर्मितीचा आतापर्यंतचा उच्चांक गाठून महाराष्ट्राची सेवा सुरुच ठेवली आहे. मात्र, आज ही सेवा करताना अधिकारी व कर्मचारी यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांना अतोनात अडचणींना सामोरे जावे लागत असून, हे अतिशय दुर्दैवी आहे. मुळात महानिर्मिती आपल्या क्षमतेपेक्षा फक्त ..... टक्के मनुष्यबळावर काम करत आहे. त्यातही महानिर्मितीच्या प्रत्येक वीजनिर्मिती केंद्रात कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. तरीही वीजनिर्मितीचा उच्चांक हे कर्मचारी गाठत आहेत. परंतु, महाराष्ट्राला उजेडात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना ह्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य मात्र पगाराविना अंधारात जात आहे. याचवेळी महानिर्मितीच्याच महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मात्र वेळेवर पगार मिळाला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विजेसारखी अत्यावश्यक सेवा पुरवताना महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस युद्धपातळीवर मिळणे अपेक्षित होते. मात्र, तिथेही या कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे.