नाशिक : राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर काही दिवसांतच छोट्या व्यापाऱ्यांना पॅकेजिंंगसाठी सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील स्वतंत्र परिपत्रकदेखील काढण्यात आले असतानाच आता गणेशोत्सवासाठी थर्माकोलवरील बंदी काही प्रमाणात अटी-शर्ती राखून शिथिल केली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्यात आल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असतानाच राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. या बंदीला विरोध करण्यासाठी व्यापारी वर्गाकडून होणारी मागणी आणि ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन छोट्या व्यापाºयांना बंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यानुसार छोट्या वस्तुंच्या किराणा पॅकिंगसाठी व्यापाºयांना दिलासा देण्यात आला. हाच धागा पकडून आता थर्माेकोल विक्रीच्या निर्णयालादेखील शिथिलता दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळणारा आहे.विघटनावर चर्चाथर्माकोल वापरण्यासाठी निदान एका वर्षासाठी परवानगी देण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी थर्माकोल विघटनाबाबतच्या पर्र्यायावरदेखील विचारविनियम सुरू झाल्याचे समजते. यासाठी अभियांत्रिकी विभाग तसेच अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या माध्यमातून उपाययोजना मागविल्या जात असल्याचे कळते. दरम्यान, थर्माकोल वापरणाºयांवर विघटनाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता असून, प्रसंगी दंडात्मक कारवाईची तरतूददेखील असणार आहे, असे समजते.प्लॅस्टिकबंदी करताना थर्माकोललादेखील बंदी करण्यात आल्यामुळे गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांचे देखावे तसेच घरगुती गणेशोत्सवावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याबरोबरच मागीलवर्षीचा थर्माकोलचा मोठा साठा व्यापाºयांकडे असल्याने यावर्षी थर्मोकोल विक्रीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागल्याने किंबहूना अशा प्रकारची चर्चा पुणे, मुंबईतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी पर्र्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी केल्यामुळे निदान यावर्षी तरी थर्माकोलवरील बंदी शिथिल होण्याची शक्यता आहे.राज्यात प्लॅस्टिकबंदी राबविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने व्यापारी आणि जनतेमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंदीची सक्ती स्वीकारण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. प्लॅस्टिक पिशव्यांपेक्षा इतर पर्याय महागडे ठरू लागल्याने छोट्या व्यापाºयांना त्यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाची भव्यता आणि पारंपरिक उत्सव लक्षात घेता निदान यावर्षी तरी थर्माकोल वापरण्याला अटी-शर्ती राखून परवानगी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवासाठी अटी-शर्ती राखून थर्माकोलबंदी शिथिल शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:41 AM