--------
बसमध्ये बसला आणि दंडाच्या भीतीने उतरला...
नाशिक महापालिकेच्यावतीने गुरुवारी शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा झाला. बी. डी. भालेकर मैदानात त्यासाठी पाच बसेस फुलांच्या माळांनी सजवून आणण्यात आल्या होत्या. महापालिकेने जाहीर करून आणि कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था करून देखील त्याठिकाणी गर्दी आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झालेच. परंतु त्यानंतर बसमध्ये शुभारंभाची (मोफत) चक्कर मारण्यासाठी देखील गर्दी झाली होती. बस सुरू झाली आणि थोडी पुढे गेली. त्यावेळी बस फेरीचा आनंद घेणाऱ्या एकाने दुसऱ्याला सांभाळून बस अगोदर तिकीट काढले ना, पुढे चेकर आहेत. तीनशे रुपये दंड होऊ शकतो, असे सांगितले. त्यामुळे भोळाभाबडा प्रवासी घाबरला. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर लगेचच चालकाला त्याने उतरवण्याची विनंती केली. चालकाने विचारल्यावर, दंड नको रे बाबा असे म्हणत तो खाली उतरलाही. सहप्रवासी मात्र हसत सुटले.