स्वप्निल जोशी नाशिकसेवानिवृत्तीनंतर नातवंडांमध्ये रमत, हास्यक्लब किंवा देवदर्शन करण्यात वेळ न दवडता नाशिकमधील प्रकाश पिंगळे (वय ७२) हा तरुण ग्रामीण भागासह आदिवासी भागातील नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याचे काम अविरतपणे करत आहे. विशेष म्हणजे या वयातही त्यांचा प्रवास सायकलवर सुरू आहे. युवकांनाही लाजवेल अशी कामगिरी करणाऱ्या पिंगळे यांची ही कहाणी.सहकारी कृषी आणि ग्रामविकास (भूविकास) बँकेतून विभागीय अधिकारी म्हणून २००३ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रकाश पिंगळे यांनी गंगापूररोड येथील निर्मलग्राम निर्माण केंद्रात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. स्वयंसेवक म्हणून काम करताना पिंगळे यांनी श्रीकांत नावरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शौचालय, घनकचरा आणि सांडपाणी याबाबत ग्रामीण तसेच आदिवासी भागात स्वच्छतेसाठी प्रशिक्षण आणि पडताळणी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, तलसारी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा भागांमध्ये जाऊन शाळेतील मुलांना प्रशिक्षण देतानाच मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यातही पिंगळे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.देशभरात साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा दिनी’ प्रकाश पिंगळे यांनी सेवानिवृत्त नागरिकांनी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर कुटुंबातूनही सेवानिवृत्त होऊन आपल्या पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपविण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या युवकांनी साधी जीवनशैली आत्मसात करून नियमित व्यायाम करणे, कुठल्याही कामाची लाज न बाळगता घरातील सगळ्या कामात मदत करण्याचे आवाहन केले आहे.
‘ते’ देतात स्वच्छतेचा संदेश
By admin | Published: January 16, 2017 1:26 AM