नाशिक : सगळे काही असूनही हार मानणारे अनेकजण आहेत. परंतु शारीरिक व्याधींवर मात करून जिद्दीच्या जोरावर आयुष्याचा मार्ग निवडणारे आदर्श असेच. अशाच शारीरिक दुर्बल मुलांनी हौसला दाखवित जिद्दीने धाव घेतली. टाळ्यांचा कडकडाट जणू या मुलांना एक एक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरणा देत असे. अंध, अपंग, मतिमंद व शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘हौसला मॅरेथॉन २०१५’मध्ये या मुलांनी आपल्यातील जिद्दीचे दर्शन घडविले. महात्मानगर मैदान ते एबीबी सर्कलपर्यंत आयोजित केलेल्या या रॅलीत हजारो मुलांनी व त्यांच्या पालक, शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रत्येक पावलावर टाळ्या वाजवून या मुलांना हौसला दिला जात असे. त्यानंतर महात्मानगर मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या मुलांनी विविध कलाविष्कार सादर करीत आपल्यातील कलागुणांची चुणूक दाखविली. दृष्टिहीन मुलांनी सादर केलेल्या चित्तथरारक रोपमल्लखांब कसरतीला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली. स्त्रीभ्रूणहत्त्या, पर्यावरण, स्वच्छ नाशिक - सुंदर नाशिक अशा विविध विषयांवर यावेळी जनजागृती करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी वनाधिपती विनायकदादा पाटील, पोलीस उपआयुक्त निसार तांबोळी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहायक संचालक हरिष बैजल, किरण चव्हाण, तेजल चव्हाण, जगबीर सिंग, युवराज पाटील, अनिकेत झवर, आशिष लकारिया, अक्षय धोंगडे, मृण्मयी राणे, जुईली वाणी यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. गौरी चव्हाण, तन्वी देवरे, आर. जे. भूषण यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
...त्यांचा वाढला ‘हौसला’
By admin | Published: February 01, 2015 12:01 AM