नाशिक : पॉलिमर प्रॉडक्ट्स कंपनीतील पूर्वी काम करणाऱ्या ज्या कामगारांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात दाद मागितली त्यांना मुळातच कंपनीने गरजेनुसार तात्पुरते कामावर घेण्यात आले होते. त्यांच्यासाठी कंपनीकडे कोणत्याही प्रकारे काम नसल्याने ३१ मेपर्यंत त्यांना काम देण्यात आलेले नाही, असा दावा कंपनीच्या व्यवस्थापनाने केला आहे. त्याचबरोबर कमगार उपआयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिले आहे. या कंपनीत काम केलेल्या महिला कामगारांनी आपल्याला कामावर कमी केल्याचा दावा केला असून, कंपनीत त्रास दिल्याची तक्रार उपआयुक्त कार्यालयात केली आहे. मात्र कंपनीने कामगारांचे सर्व दावे फेटाळले आहेत. कंपनीने ३० कामगार कमी केल्याचा आरोप चुकीचा असून, कंपनीत आरोप करणाºया महिला कामगारांसह ३५ कामगार होते आणि आजही ३० कर्मचारी काम करीत असल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कंपनीत अॅसिडचे कोणतेही काम होत नसल्याने अशी कामे देऊन महिलांना त्रास दिल्याचा कंपनी व्यवस्थापनाने इन्कार केला आहे. कंपनीतील युनियन आणि व्यवस्थापनात कोणताही वाद नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
ते कामगार तात्पुरतेच, पॉलिमरचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:38 AM