शहरात रविवारी विविध मंत्र्यांसह संभाजीराजे भोसले यांचा नाशकात दौरा होता. यामुळे शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. संध्याकाळी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गंगापूर रोडवरील एका लॉन्समध्ये बनकर यांच्या कन्येचा विवाहसोहळा पार पडला. ‘ग्रेपपार्क’ रिसॉर्ट येथील शासकीय अधिकाऱ्यांसोबतची आढावा बैठक आटोपून उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय असे सर्वच वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. यामुळे लॉन्सच्या परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मंत्र्यांच्या ताफ्यासह शासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा लॉन्सच्या आवारात दाखल झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. पोलीस बंदोबस्त, तसेच खासगी सुरक्षारक्षक सभोवताली असतानाही मांढरे यांचे पाकीट या लॉन्समध्ये अज्ञात पाकीटमाराने लांबविल्याची घटना घडल्याची जोरदार चर्चा झाली. चोख सुरक्षाव्यवस्था असतानाही चेारट्याने थेट व्हीआयपी पाहुण्यांपैकी एक असलेले मांढरे यांचे पाकीट चलाखीने चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, मांढरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी आज अनेक ठिकाणी गेलो होतो, त्यामुळे पाकीट नेमके कोठे गहाळ झाले, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही.
---इन्फो---
सुरक्षारक्षकांसह पोलिसांची धावपळ
पाकिट गहाळ झाल्याचे जेव्हा मांढरे यांच्या लक्षात आले, तेव्हा लॉन्समध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षक व पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. ही बाब त्यांनी तत्काळ येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. पाकिटामध्ये त्यांचे आधार कार्ड, डेबिट, क्रेडिट कार्डांसारखी महत्त्वाची कागदपत्रे व रोकड असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
---इन्फो--
काही दिवसांपूर्वीच लग्नातले वऱ्हाडी चोर ताब्यात
शहरातील गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वीच लग्नसोहळ्यात बनावट वऱ्हाडी बनून हजेरी लावणारे आंतरराज्यीय टोळीतील चोरट्यांना मध्य प्रदेशमधून बेड्या ठोकल्या, तरीही शहरातील लग्नसोहळ्यात चोऱ्या सुरूच असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.