माळवाडी : कांदद्याला मिळत असलेला चढा भाव आणि कांदा रोपांचा मोठ्या प्रमाणावर भासत असलेला तुटवडा या परिस्थितीमुळे आता चोरट्यांची नजर शेतातील कांद्याच्या रोपांवरही पडली असून फुलेमाळवाडी (ता. देवळा ) येथील सुनील शहाणा गांगुर्डे यांच्या शेतातील पाच एकर क्षेत्रातील लागवडीचे उन्हाळी कांदा रोप चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फुलेमाळवाडी मधील सुनील गांगुर्डे हे शेती व्यवसाय करतात. या वर्षी अति पावसामुळे उन्हाळी कांदा रोप खराब झाले. त्यानंतर गांगुर्डे यांनी नोव्हेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर २० किलो ऐलोरा कंपनीचे कांदा बी टाकले होते. या रोपांसाठी त्यांनी ५ एकर शेती कांदा लागवडीसाठी तयार करून ठेवली असतांना दोन दिवस आधी चोरट्यांनी रात्रीच्या वेळीस कांदयाचे रोप चोरून नेले असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी देवळा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा पिकाच्या इतिहासात पहिल्यांदा कांद्याला चांगला दर मिळाला असताना त्यात दुसरीकडे लाखो रु पयांचे कांदा रोप खराब होणे आणि आता कांदा रोप चोरीच्या घटनांचे स्वरूप पाहता कांदा रोप ढगाळ वातावरणामुळे खराब होत राहिल्यास पुढचे चित्र कसे असेल हे सांगणे अवघड होऊन बसणार आहे. कांदा रोप चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कांद्याच्या रोपांवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 5:20 PM
फुलेमाळवाडीतील प्रकार : पोलिसात तक्रार दाखल
ठळक मुद्देगांगुर्डे यांनी नोव्हेंबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर २० किलो ऐलोरा कंपनीचे कांदा बी टाकले होते.