पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण गोविंद चंद्रात्रे (७८, रा. सत्य संगम हौसिंग सोसायटी) शुक्रवार (दि.३) सकाळी सात ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान पत्नीसोबत घराबाहेर पडले. यावेळी त्यांनी त्यांचे राहती आठ क्रमांकाची सदनिका योग्यरीत्या कुलूप लावून बंद केली. या दरम्यान, चोरट्यांनी ते फिरायला गेले असल्याची संधी साधत घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले ५० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या, ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चंद्रात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा अज्ञात चाेरट्यांविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी घरफोडी केली; मात्र घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा हा पूर्णपणे शाबूत असल्याने तसेच अन्य बाजूंच्या खिडक्यादेखील सुस्थितीत असल्यामुळे चोरटे घरात नेमके कोठून आणि कसे शिरले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरातील दागिने गायब झाले असून पोलिसांपुढे या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
‘मॉर्निंग वॉक’ला गेले अन् चोरट्यांनी घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:18 AM