नाशिकरोड : मोटवानी रोडवरील मोगल हॉस्पिटलजवळील दीपक अपार्टमेंटमध्ये बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली पाच लाखांची रोकड व ३७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा एकूण साडे सोळा लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गेल्या दीड वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात झालेल्या घरफोड्यांमध्ये सर्वाधिक ऐवज या घटनेत गेल्याने पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मोटवानीरोड सार्थक शूज दुकानजवळील दीपक अर्पाटमेंटमध्ये वासुदेव ठाकूरदास आमेसर कुटुंबीय राहाते. करण वासुदेव अमेसर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या चुलत बहिणीचे गुरुवारी इंदिरानगर येथील हॉटेलमध्ये लग्न असल्याने संपूर्ण आमेसर कुटुंबीय बुधवारी सकाळी विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह सोहळा आटोपून आमेसर कुटुंबीय गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आले असता, बेडरूममधील कपाटातील साहित्याची उचका - पाचक केल्याचे दिसले. त्यामुळे चोरी झाल्याचे आमेसर कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी पाहणी केली. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्याचे लक्षात आले. घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील रोख पाच लाख रुपये व सुमारे ३७ तोळ्यांचे सोन्याचे विविध दागिने असा १६ लाख २२ हजार ८०० रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. घरफोडीची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, कुंदन जाधव, क्राईम ब्रँचचे अधिकारी, कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट===
वजनामुळे तिजोरी बचावली
आमेसर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर कपाटात छोटीशी तिजोरी ठेवलेली होती. त्यामध्येदेखील सोन्याचे दागिने होते. परंतु ती तिजोरी लाॅक असल्याने व तिची चावी न मिळाल्याने चोरट्यांनी तिजोरी वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर आणून ठेवली. त्या तिजोरीचे वजन जास्त असल्यामुळे चोरट्यांनी ती तिजोरी घेऊन न जाता सोडून दिली. त्यामुळे सुदैवाने तिजोरीतील दागिने वाचले.