नाशिक : हैदराबादमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ५४ गुन्हे दाखल असलेला व पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह गत सात-आठ महिन्यांपासून फरार असलेला महंमद मुजीब अफान बिन (रा़ घर नंबर ८-२-६०३/१५७/अे, बंजारा ईस्ट, जोहरानगर, शिंगाडा वस्ती, हैदराबाद) या अवघ्या पंचवीस वर्षीय सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या महंमद बिन याने शहरात टोळी तयार करून सोनसाखळी चोरीच्या अकरा गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़शहर गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई स्वप्नील जुंदे्र यांना महंमद बिन या सराईत गुन्हेगाराबाबत माहिती मिळाली होती़ त्यास गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने हैदराबाद येथून रेल्वेने नाशिकला आल्याचे सांगून येथे ५४ गुन्हे दाखल असल्याचे सांगितले़ शहरातील सराईत गुन्हेगार अक्रम अस्लम खान (३०, रा. एन.डी. पटेलरोड, पंचशीलनगर, गंजमाळ) याच्याशी त्याची ओळख झाली. यानंतर महंमद बीन, अक्रम खान व अहमद शेख कादर शेख (३०) व आणखी एक साथीदार अशा चौघांनी शहरात महिलांच्या सोनसाखळ्या खेचने, घरफोड्या केल्याच्या ११ गुन्ह्यांची कबुली दिली़ पोलिसांनी त्याच्याकडून १६ तोळे सोने, दोन दुचाकी असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ नाशिक पोलिसांनी बिन यास अटक केल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिल्यानंतर ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत़ कायदेशीर प्रक्रियेनंतर बिनला हैदराबाद पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. यावेळी उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, सचिन गोरे उपस्थित होते.
हैदराबादच्या चोरट्यास नाशिकमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:24 AM