नाशिक : शहरात गुन्हेगारी फोफावत असताना सामान्य नागरिकांनाही भररस्त्यात गंडा घातला जात आहे. एका प्रवाशाच्या बॅगेतून रिक्षा प्रवासात सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात सहप्रवाशांनी लंपास केले तर दुसऱ्या घटनेत भरदुपारी झालेल्या घरफोडीत साडेदहा लाखांचे दागिने चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात अशाप्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
ध्रुवनगर परिसरातील बालाजी पॅराडाइज या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मीरा शशिकांत गंभीरे (५०) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी भरदुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले तीन मंगळसूत्र, एक अंगठी, एक चैन, चार बांगड्यासह कर्णफुले, नथ चोरट्यांनी लंपास केली. एकूण दहा लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घरफोडीप्रकरणी गंभीरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
अशोकनगर भागात राहणारे एक दाम्पत्य त्र्यंबक नाका सिग्नल येथून अशोकनगरकडे जाण्यासाठी एका रिक्षेत बसले. त्या रिक्षामध्ये अगोदरच चालक व अन्य दोन प्रवाशी मागील सीटवर बसलेले होते. यावेळी फिर्यादी विठ्ठल जिंगू पाटील (६४) हे देखील पत्नीसोबत रिक्षात बसले. सातपुरपर्यंतच्या या रिक्षाप्रवासात त्यांच्या बॅगेतील सात तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, अडीच तोळ्याची सोनसाखळी, एक ब्रेसलेट असा सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज सहप्रवाशी दोन्ही पुरुषांनी लुटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रवासात रिक्षा कोठेही थांबली देखील नव्हती. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह अन्य दोन संशयित अनोळखी सहप्रवाशांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.