अहिल्यादेवी होळकर मार्गावरील ट्रॅफिक ए्ज्युकेशन पार्कच्या परिसरात असलेल्या प्रथमेशनगरातील पूनमपुष्प सोसायटीच्या पाच क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे प्रफुल पूनमचंद जैन (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २५ मे ते ५ जूनदरम्यान जैन यांच्या वृध्द आत्या चांदाबाई जैन या त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या. घरात अन्य कोणीही नसल्याचे बघून उघड्या राहिलेल्या दरवाजातून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. त्याने घरातील कपाटात ठेवलेले २० हजारांचे दहा ग्रॅमचे मंगळसूत्र, ९० हजारांच्या ४५ ग्रॅम वजनाच्या दोन पाटल्या, २५ ग्रॅम वजनाचे ५० हजारांचे कर्णफुलांचे जोड, ८५ ग्रॅम वजनाचा १ लाख ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, १०ग्रॅम वजनाच्या २० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असे सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताच लॉकडाऊनचे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहे. निर्बंध शिथिल होताच शहर व परिसरात चोरटे सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सातपूर भागात अशाच प्रकारे चोरट्याने मोठी घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला होता.