नाशिक : कॅनडा कॉर्नरसारख्या शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधील सॅमसंग मोबाइल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरवर चोरट्यांनी डल्ला मारला. महागड्या १५ ते २० मोबाइल हॅँडसेटसह काही स्पेअर पार्ट असा एकूण दोन लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभय विजयकुमार वडगावकर (रा. सावरकरनगर) यांचे कॅनडा कॉर्नर येथे कमल सोसायटीमध्ये सॅमसंग कंपनीचे अल्फाबेटिक्स बिझिनेस मशीन्स प्रा. लि. नावाचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी बंद सर्व्हिस सेंटरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी दुकानात दुरुस्तीसाठी ठेवलेले महागडे सॅमसंग कंपनीचे १५ ते २० मोबाइल आणि स्पेअर पार्ट असा सुमारे २ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. घटनेची माहिती मिळताच सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्हीचे चित्रीकरणदेखील तपासले आहे. त्याआधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. शहरात काही महिन्यांपूर्वीच एका कुरियर कंपनीच्या कार्यालयामधून मोबाइल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वडगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
सर्व्हिस सेंटरवर चोरट्यांचा डल्ला
By admin | Published: April 23, 2017 2:41 AM