जुने नाशिक : घरात झोपलेल्या कुटुंबीयांच्या अंगावर गरम पाणी पडून झालेल्या दुर्घटनेने गुरुवारी तिसरा बळी घेतला. न्हाणीघरातील विजेचे बटण सुरू राहिल्याने हीटरमधील उकळते पाणी अंगावर पडून पुत्र रविवारी, तर पिता मंगळवारी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. याच घटनेत गंभीर भाजलेल्या पाच वर्षांच्या मुलीलाही गुरुवारी मृत्यूने गाठले. जुन्या नाशकातील या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारची (दि. २८). जुन्या नाशकातील जोगवाडा येथे रिक्षाचालक निजाम सय्यद यांचे एका खोलीचे घर आहे. त्यातील न्हाणीघराच्या दोन ते अडीच फुटाच्या भिंतीवर प्लॅस्टिकच्या पंधरा लिटरच्या ड्रमला ओपन हिटर कॉईल जोडलेली होती. सय्यद यांनी रात्री बारा वाजता पाणी तापवण्यासाठी हीटरचे बटण सुरू केले आणि बटण बंद न करताच ते झोपी गेले. या भिंतीलगतच त्यांचे संपूर्ण कुटुंब झोपलेले होते. दोन ते तीन तासांनी ड्रममधील पाणी उकळून ड्रम फुटला आणि उकळते पाणी या कुटुंबावर पडले. या दुर्घटनेत कुटुंबातील तिघे जण गंभीररीत्या भाजले. त्यातील मुलगा मोहम्मद रझा (वय ३) याचे रविवारी (दि. ३०), वडील निजाम सय्यद (वय ३५) यांचे मंगळवारी (दि. २), तर आज गुरुवारी सकाळी मुलगी अलीजा सय्यद (वय ५) हिचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबात गेल्या पाच दिवसांमध्ये तीन मृत्यूच्या घटना घडल्याने जुन्या नाशकावर शोककळा पसरली आहे.जुन्या नाशकातील बडी दर्गासमोरील जोगवाडा परिसरात राहणाऱ्या रिक्षाचालक निजाम सय्यद यांच्या गरीब कुटुंबावर नियतीने आघात केला. लागोपाठ झालेल्या पती व मुला-मुलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे शहनाज सय्यद यांना जबर मानसिक धक्का बसला असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या शुक्रवारी घडलेल्या दुर्घटनेतून सुदैवाने निजाम यांच्या पत्नी शहनाज व त्यांचा सात वर्षांचा मुलगा बचावला. शहनाज भिंतीपासून दूर झोपल्या होत्या, तर मुलगा नातेवाइकांकडे गेला होता. या घटनेत निजाम हे ३५ टक्के, मुलगा रझा ३० टक्के व मुलगी अलीजा ४५ टक्के भाजली होती, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. निजाम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजयी, सासू असा मोठा परिवार आहे. दरम्यान, गुरुवारी मयत झालेल्या अलीजा हिच्या पार्थिवाचा शोकाकुल वातावरणात स्थानिक कब्रस्तानामध्ये पारंपरिक पद्धतीने दफनविधी करण्यात आला. (वार्ताहर)
हीटरमधील उकळते पाणी अंगावर पडून तिसरा बळी
By admin | Published: December 05, 2014 1:27 AM