नाशिक : घरातूनच राजकारणाचे बाळकडू असूनही जिल्हाधिकारी होण्याच्या अपेक्षेने परीक्षेची तयारी करणाऱ्या माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावित यांच्या कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीतील युवती नयना रमेश गावित यांनी पदार्पणातच थेट जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाला गवसणी घातली आहे. जिल्हा परिषदेचा वाडीवऱ्हे गट अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव झाला आणि इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्या कन्या नयना गावित यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकमधील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये झाल्यानंतर नयना गावित यांचे महाविद्यालयीन शिक्षण बी.वाय.के. महाविद्यालयात झाले. पुढे पदवीचे शिक्षण त्यांनी मुंबई येथील विल्सन महाविद्यालयात २००७ ते २००९ या दरम्यान घेत पदवी प्राप्त केली. त्यानंतर दूरशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सिम्बॉयसिस महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. जिल्हाधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने त्यांनी लोकसेवा आयोगाचा कसून अभ्यास केला होता. मात्र अवघ्या १० ते १२ गुणांनी त्यांना परीक्षेत अपयश आले. आता २०१७ ला गट आरक्षित होताच सुशिक्षित व युवा नेतृत्व म्हणून कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर वाडीवऱ्हे गटातून कॉँग्रेसच्या माध्यमातून निवडून येत दुसऱ्यांदा जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाला नयना रमेश गावित यांनी गवसणी घातली. आजोबा माणिकराव गावित केंद्रात मंत्री, आई निर्मला गावित दुसऱ्यांदा इगतपुरीच्या आमदार आणि वडील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता असे सगळे घरातील वातावरण असतानाच नयना गावित २१ मार्च २०१७ ला जिल्हा परिषदेच्या सर्वात तरुण उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. (प्रतिनिधी)
गावितांची तिसरी पिढी राजकारणात
By admin | Published: March 22, 2017 1:53 AM