दरवर्षी पवित्र अशा श्रावण महिन्यात येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी जारी केली असली तरी सर्वच बस, खाजगी वाहने चालू असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने प्रदक्षिणा मार्ग बंद करून ठेवला आहे. ब्रह्मगिरीच्या फेरीला मनाई करण्यात आलेली आहे. संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी ती केवळ नावालाच असून गेल्या दोन्ही श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले होते. गावातील व्यवहार आता सुरळीत चालू झाले आहेत. दुकाने-हॉटेल्स उघडली गेली आहेत. त्यामुळे भाविकांची वर्दळ बघायला मिळत आहे. महामंडळाच्याही बसेस सुरू असून त्या बस स्थानकांवर तर खाजगी वाहने गावाबाहेरील जव्हारफाटा ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारापर्यंत उभी केली जात आहेत. त्र्यंबकेश्वरी तिसऱ्या श्रावण सोमवारी सिंहस्थ पर्वणीचेच दर्शन घडत असते. एक महिना अगोदर त्र्यंबक तहसीलदार, त्र्यंबक पोलीस स्टेशन, नगर परिषद, प्रांताधिकारी याच्या नियोजनात गुंतलेले असतात. सर्व शहरभर बॅरीकेडिंग केले जात असते. यंदा मात्र, कोरोनामुळे शांतता दिसून येत आहे. अनेक संस्था, संघटनांमार्फत श्रावणी सोमवारी मोफत फराळ वाटपाचे नियोजन केले जात असते. त्यालाही यंदा मनाई करण्यात आली आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारीही घडणार केवळ कळसाचेच दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:17 AM