श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारच्या दिवशी दर्शनाला खूप महत्त्व मानले जाते. त्यामुळे दरवर्षी श्रावणात शेकडो भाविक कपालेश्वर, नारोशंकर मंदिरात दर्शनाला गर्दी करतात. श्रावणात महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी काढली जाते. यंदा पालखीला परवानगी नसल्याने भाविकांना दर्शन व पालखी मिरवणुकीपासून वंचित राहावे लागले आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त दरवर्षी कपालेश्वर मंदिराबाहेर शेकडो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असतात. यंदा रस्ते, मंदिर भविकांविना ओस पडल्याचे दिसून आले. सकाळी कपालेश्वर मंदिरात मंदिराच्या गुरव तसेच पूजाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महादेवाला अभ्यंगस्नान पूजन, साजशृंगार करून आरती करण्यात आली. तर सायंकाळी महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची मंदिराला तीन प्रदक्षिणा मारून पालखी सोहळा पार पडला. कोरोनामुळे श्रावणात मंदिर बंद राहिल्याने भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले, तर पूजा साहित्य व प्रसाद विक्री दुकाने ओस पडल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कपालेश्वर मंदिर मुख्य दरवाजा व मंदिरात जाणारे प्रवेशद्वार कुलूपबंद असल्याने दरवाजावर डोके टेकवून भाविकांना दुरून दर्शन घ्यावे लागले.
तिसरा श्रावण सोमवार दर्शनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:19 AM