संजय पाठक
नाशिक : आधी स्वामी श्री कंठानंद त्यानंतर प. पु. शांतीगिरीजी आणि आता आणखी एक आध्यात्मिक गुरूंनी लोकसभेच्या नाशिकच्या आखाड्यातउतरण्याची तयारी केली आहे. त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती असे यांचे नाव असून, त्र्यंबकेश्वर येथील दहा शैव पंथीय आखाड्याचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यंदा लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
शिंदे गट की भाजप आणि त्यात नंतर आलेले राष्ट्रवादी व मनसे अशी चौरंगी रस्सीखेच सुरू असून, त्यातच अचानक आध्यात्मिक गुरूंनी उड्या घेतल्या. आधी श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थानचे स्वामी श्री कंठानंद यांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या पाठोपाठ प. पू. शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली. त्यानंतर आता त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हे नाशिकमधून निवडणूक लढण्यास उत्सुक असून, आपल्याला त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
स्वामी श्री कंठानंद यांनी भाजपात प्रवेश केला. प. पू. शांतिगिरी महराज शिंदे गटाकडे गेले. मात्र, महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी अद्याप पक्ष निवडलेला नाही. ज्या पक्षाला आपण योग्य वाटेल त्या पक्षाने संधी द्यावी, असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.