------
नाशिक : वडाळानाका येथील एका अपार्टमेंटमध्ये आठवडाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एकूण आठ लोक गंभीरपणे भाजले होते. त्यापैकी सात जखमींचा या दहा दिवसांत मृत्यू झाला आहे. यामध्ये चार युवक आणि तीन महिलांचा समावेश आहे. मुस्कान वलीउल्ला अन्सारी (२५) या तरुणीचीही प्राणज्योत शनिवारी मध्यरात्री रुग्णालयात मालवली.
संजरीनगर अपार्टमेंटमध्ये गेल्या शुक्रवारी गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सय्यद कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामध्ये दोन महिला व दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच अन्सारी कुटुंबातील तिघा सख्या भावंडांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे. या दोन्ही कुटुंबांवर आभाळ फाटले आहे. या दहा दिवसांत संजरीनगरमधून लागोपाठ दरदिवसाआड मयतांचे जनाजे (तिरडी) उचलण्याची दुर्दैवी वेळ समाजबांधवांवर ओढावली. या दुर्घटनेत दोन्ही कुटुंबातील कर्ते तरुण मुले, मुली मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
---इन्फो-----
.....म्हणून अन्सारी कुटुंबीय खाली धावून आले
संजरीनगर अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर अन्सारी कुटुंबीय राहत होते. सैयद यांच्या तळ मजल्यावरील फ्लॅटमध्ये नेमके काय घडले आणि सगळा गोंधळ व रहिवाशांची धावपळ का उडाली हे बघण्यासाठी शोएब अन्सारी, रमजान अन्सारी आणि त्यांची बहीण मुस्कान हिने खाली धाव घेतली. आपले वडील वलीउल्ला अन्सारी नेमके कोठे आहेत, याचा शोध घेत असतानाच अचानकपणे तळमजल्यावरील घरात मोठा स्फोट झाला आणि तिघेही गंभीरपणे भाजले गेले, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
---इन्फो-----
यांचा झाला मृत्यू
नसरीन नुसरद सय्यद (२५), सईदा शरफोद्दीन सय्यद ( ४९), लियाकत रहीम सय्यद (३२), नुसरद रहीम सय्यद (२५), शोएब वलीउल्ला अन्सारी (२८) रमजान वलीउल्ला अन्सारी (२२), मुस्कान वलीउल्ला अन्सारी (२५) यांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे.