येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत असून, डोंगराळ भागातील पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीटंचाईची धग जाणवू लागली आहे.येवला तालुक्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला होता, मात्र उन्हाच्या चटक्यांबरोबरच ग्रामीण भागातील जलस्रोत कोरडे होत गेल्याने १३ मार्चपासून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला होता. विशेष म्हणजे पूर्ण वर्षभर टँकरने पाणीपुरवठा सुरूच होता. यंदा मात्र, पर्जन्याचे प्रमाण चांगले राहिल्याने गतवर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात पाणी अजून टिकून आहे. मात्र, डोंगराळ भागातील गावांनी पाणी मागणी नोंदविली आहे. तालुक्यातील अहिरवाडी, जायदरे, चांदगाव, हडप सावरगाव, खरवंडी, ममदापूर, तांडा वस्ती, आडसुरेगाव या गावातील जलस्रोत कोरडे होत गेल्याने या गावांनी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी येवला पंचायत समितीकडे केली आहे.पंचायत समितीच्या संबंधित विभागाला सदर प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या व पाणी मागणाºया गावांचे टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ कसे मंजूर होतील यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिल्या आहेत.अधिकारीवर्ग कोरोनाच्या उपाययोजनेत व्यस्तपंचायत समितीकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावाची पडताळणी करून सदर प्रस्ताव येवला तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. यात येवला येथील प्रांताधिकारी पद रिक्त असून, मालेगाव प्रांताधिकारी यांच्याकडे येवल्याचा अतिरिक्त भार आहे. मालेगाव आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने तेथील अधिकारी कोरोना रोखण्यात व्यस्त झाले आहे. परिणामी टँकर सुरू करण्याबाबतच्या या प्रस्तावावर स्वाक्षºया होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येवला तालुक्यातील पाणी मागणी केलेल्या गावांचे टँकर सुरू करण्याबाबचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून, तहानलेल्या गावांना लवकरात लवकर कसे पाणी देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे.- प्रवीण गायकवाड, सभापती, येवला पंचायत समिती