नाशिक : नववर्षाच्या पूर्वसंधेला नागरिकांनी घरातच राहून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन नाशिक शहर पोलीस व प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याला नाशिककांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात कडेकोट नाकाबंदी करूनही केवळ दोनच मद्यपी मद्यपान करून वाहन चालविताना पोलिसांना आढळून आले, तर एकाला धारदार शस्त्रासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघांवर सक्तीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मद्यपी वाहन चालविताना आढळून आला. त्याच्यावर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुन्हा दाखल झाला असून, सायंकाळी शुक्रवारी (दि.१) सायंकाळी उशिरापर्यंत संबधित मद्यपी चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याचप्रमाणे, तर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एकाला मद्यपान करून वाहन चालविताना पोलिसांनी ताब्यात घेतेले. मात्र, नाशिकरोड पोलीस ठाण्याकडून मद्यपीची माहीती दडविण्याचा प्रयत्न होत असून, शुक्रवारी दुपारपर्यंत मद्यपीची कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही. या दोघांवरही ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह प्रकरणात पोलिसांच्या नाकाबंदीत दोघावर कारवाई करण्यात आली आहे, तर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या एकावर आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्तीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इन्फो-
गंगापूरमधून चॉपर जप्त
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक रोडच्या गायकवाडमळ्यातील पंकज रमेश गारोडे (३७) याच्याकडून पोलिसांनी ४४ सेमी लांबीचा धारदार चॉपर जप्त केला आहे. त्याच्यावर विनापरवानगी शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल कण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.