मालेगाव : महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत आतापर्यंत साडेचारशेपेक्षा जास्त अतिक्रमणांवर जेसीबी फिरविण्यात आले आहे.महानगरपालिकेतर्फे सुमारे आठ वर्षांनंतर शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे नेतृत्व आयुक्त किशोर बोर्डे करीत असून, अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे यांच्यासह सर्व प्रभाग अधिकारी, बीट मुकादम यांच्यासह शैलेश सोळंकी, अतिक्रमण गस्तीपथकाचे दिनेश मोरे, जगदीश सुपारे, जुबेर अहमद यांच्यासह १५ कर्मचारी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढत आहेत. यापूर्वी शहरात आलेल्या आयुक्तांपैकी पहिले आयुक्त हर्षदीप कांबळे, डी.जी. फिलिप्स, सुधीर राऊत यांनी अतिक्रमणांबरोबरच शहराचा बकालपणा दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. गेल्या आठ वर्षात शहरातील अतिक्रमणांत मोठी वाढ झाली होती. या अतिक्रमणाच्या विळख्यात शहरातील रस्त्यांचा श्वास गुदमरत असतानाही तत्कालीन आयुक्तांनी त्याकडे लक्ष न देता आपला कार्यकाल पूर्ण करण्यावर भर दिला. या सर्वाचा परिपाक म्हणून अनेकांनी आपले प्राणही गमावले. त्यामुळे या अतिक्रमणांवर हातोडा फिरविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येऊ लागली. यामुळे आयुक्त बोर्डे यांनी शहरात १६ पासून मोहीम राबविण्यास सुरुवात केली. या मोहिमेला खऱ्या अर्थाने १८ जानेवारीपासून सुरुवात झाली. ही मोहीम मनपाच्या नेहमीच्या मोहिमेसारखी फार्स ठरणार असल्याचे भाकीत करत, एक दोन दिवसात मोहीम बंद करण्यात येईल असे बोलले जाऊ लागले. मात्र आयुक्त व अतिक्रमण विभाग यांनी या सर्वांना तोंडात बोट घालायला लावत ही मोहीम जोरदार सुरू ठेवली आहे. (प्रतिनिधी) यात काही दिवसांचा अपवाद आहे. सदर मोहीम महापालिकेतर्फे राबविण्यात येत असली तरी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांचा मोठा हातभार आहे. या मोहिमेत पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने स्वत: सहभागी होत असून, रोज बंदोबस्त उपलब्ध करून देत आहेत. या मोहिमेमुळे शहरातील काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.
मालेगावी साडेचारशे अतिक्रमणे जमीनदोस्त
By admin | Published: February 02, 2016 10:23 PM