नाशिक : विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सजग नागरिकांमुळे महापालिकेला सहजगत्या गायब होणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत असून, त्या आधारे आत्तापर्यंत सुमारे तीस नागरिकांना प्रशासनाने शोधून ताब्यात घेतले आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी विदेशातून प्रवास करून आलेल्यांबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. विशेषत: केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाग्रस्त देशांची यादी तयार केली असून, या देशातून जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जाते. तसेच त्यांना घरातच निगराणीखाली ठेवले जाते.चौदा दिवस त्यांना अशाप्रकारे देखरेखीखाली ठेवताना त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आहे किंवा नाही याची तत्काळ माहिती मिळते. विशेषत: चीन, इटली, जर्मनी यांसारख्या देशांतून १५ मार्चनंतर प्रवास करून आलेल्यांची विशेष दक्षता घेतली जाते आणि त्यांची तपासणी केली जाते. परंतु त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी घरातच राहणे आवश्यक असतानादेखील अनेक जण कामाचे निमित्त करून घराबाहेर पडतात. त्यांना संसर्ग असेल तर तो समाजासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने अखेरीस त्यांचा शोध घेऊन पकडावे लागते.महापालिकेने त्यावर पर्याय शोधला असून, संबंधित सोसायटी किंवा बंगल्यावर हे घर कोरंटाईनमध्ये आहे असे स्टिकर लावले जात आहे.त्यामुळे आजूबाजूचे नागरिक सतर्क होतात आणि समजा त्या घरातील व्यक्ती विशेषत: विदेशातून आलेला सदस्य घराबाहेर पडलाच तर कोणी ना कोणी सजग नागरिक महापालिकेला तत्काळ कळवतात. त्यामुळे महापालिकेला संंबंधितांचा शोध घेणे सोपे जाते.महापालिकेने अशा प्रकारे तीनशे घरांवर स्टिकर्स लावले असून त्यामुळे आत्तापर्यंत तीस जणांना पुन्हा शोधण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकत नसतील तर अशा नागरिकांची मात्र तपोवनातील विशेष विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येत आहे.महापालिकेने आत्तापर्यंत तीनशे घरांना स्टिकर्स लावले आहेत. निगराणीतून कोणी व्यक्ती बाहेर पडलाच तर स्टिकर्समुळे सजग नागरिक तत्काळ महापालिकेला कळवतात. संबंधित माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातात. आत्तापर्यंत सूचनांचे पालन न करणारे तीस नागरिक ताब्यात घेतले असून पाच जणांना तपोवनातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका
होम कोरंटाइन असूनही गायब होणारे तीस जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 9:44 PM
विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सजग नागरिकांमुळे महापालिकेला सहजगत्या गायब होणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत असून, त्या आधारे आत्तापर्यंत सुमारे तीस नागरिकांना प्रशासनाने शोधून ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देमनपाकडून दखल : घरांवर लावले जातात स्टिकर्स